ग्रामविकासातून राष्ट्रविकास साध्य

SourceRSS Janakalyan Samiti Maharashtra Prant    Date14-Jan-2020
 

Vagholi_1  H x  
'गावातील पाणीप्रश्न नुसता सोडवून चालणार नाही, तर त्याबरोबर ग्रामस्वच्छता, आरोग्य, शुद्ध पेयजल, शिक्षण या समस्यांची सोडवणूक जर गावपातळीवर झाली, तर ग्रामविकासातून राष्ट्रविकास निश्चित साधला जाईल,' असा विश्वास 'भारत फोर्ज'चे अध्यक्ष उद्योजक बाबा कल्याणी यांनी व्यक्त केला.
भारत फोर्ज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पुढाकाराने शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील बंधाऱ्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी साठले असून, त्याचे जलपूजन कल्याणी यांच्या हस्ते झाले. या वेळी संघाचे क्षेत्रीय प्रचारक अतुल लिमये, जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, भारत फोर्जचे संचालक गिरीराज, 'सीएसआर' प्रमुख श्रीमती देशपांडे, संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मुळे, जनकल्याण समितीचे नगर दक्षिणचे अध्यक्ष झरकर, भारत फोर्जचे समन्वयक जयदीप लाड उपस्थित होते. कल्याणी यांनी बंधाऱ्याचे जलपूजन केल्यानंतर बंधाऱ्याजवळच वृक्षारोपणही केले.
या वेळी त्यांनी ग्रामविकासाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. बंधाऱ्यातील पाण्यामुळे शेतीला झालेला फायदा त्यांना सांगण्यात आला. ग्रामस्थ व शेतकरी उमेश भालसिंग (वाघोली), छाजेड (बालमटाकळी), शेवाळे (वडगाव गुप्ता), पायघन (आखेगाव) आणि डॉ. फलके (फलकेवाडी) यांनी आपल्या गावात झालेल्या बंधारे खोलीकरण प्रकल्पाची व त्यात पाणी साठल्याने शेतीसाठी झालेल्या उपयोगाची माहिती या वेळी दिली. उद्योजक नंदकिशोर नातू यांनी स्वागत केले. अनिल मोहिते यांनी प्रकल्पाची माहिती दिली. दिवंगत कार्यकर्ते शेषराव जवरे यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. डांगे, पारगावकर, डॉ. देहाडराय, कासार, देवढे उपस्थित होते. संतोष दहिफळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. मनोहर देशपांडे यांनी आभार मानले.
...............
३२ गावांतून जलविकास
जनकल्याण समितीने मागील तीन वर्षांपासून दक्षिण नगर जिल्ह्यात शाश्वत जलस्त्रोत विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीसह पुण्याच्या भारत फोर्ज व प्राज फाउंडेशन या संस्थांच्या सामाजिक बांधिलकी निधीच्या पाठबळाने बंधाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले गेले. तीन वर्षांत मिळून ३२ गावांतून कामे हाती घेण्यात आली. पहिल्या दोन वर्षांत अनुक्रमे १३ व १० कामे पूर्ण झाली. यंदा तिसऱ्या वर्षी नऊ कामे केली गेली. पावसाने या बंधाऱ्यांची पाणीसाठवण क्षमता वाढली आहे. बंधारे खोलीकरण केलेल्या गावांतून जनकल्याण समितीने 'स्वच्छ शाळा-सुंदर शाळा' प्रकल्पही राबवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दीडशेवर शाळांतून झालेल्या या प्रकल्पाच्या स्पर्धेत वाघोलीच्या शाळेला बक्षीस मिळाले आहे.