कोरोना आपदा परिस्थिती मध्ये, रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) मुंबई महानगर द्वारा मुंबई मध्ये सेवा कार्य हाती घेण्यात येत आहेत. त्यामध्ये मुंबई स्थित रुग्ण ज्यांना काही अनिवार्य उपचारांसाठी जसे डायलिसिस इत्यादी साठी रुग्णालयात जाणे जरुरी आहे, अशांसाठी वाहन उपलब्ध करून देणे हि योजना चालू आहे
या योजने अंतर्गत काम करत असताना आलेला एक अनुभव.
आज दिनांक २३ मार्च, ‘२०२० रोजी सकाळी साधारण १०:३० वाजता श्रीमती स्नेहलता रामकृष्णन यांचा मला फोन आला. अस्खलित मराठीतून मॅडमनी विचारलं कि त्यांना संध्याकाळी ५ वाजता जसलोक इस्पितळात जायचे आहे. माटुंग्यावरून घेऊन जायचं आणि परत घरी आणून सोडायचं, जमेल का? मला आदल्या दिवशी विभाग कार्यवाह श्री. अंकुशजी बेटकर यांच्या फोन आला होता त्यामुळे केव्हाही फोन येईल आणि जावे लागेल याची कल्पना होती. मी तात्काळ त्यांना हो म्हणून सांगितलं. तासाभराने पुन्हा फोन आला कि आपल्याला ३ वाजता जावं लागेल, कारण डॉक्टरांनी लवकर यायला सांगितलंय. मी ही त्याप्रमाणे गाडी घेऊन १:३० वाजता मॅडमच्या घरी पोहोचलो.
गाडीत बसल्यावर मॅडमनी लगेचच बोलायला सुरुवात केली. वय वर्ष ७०, आज कॅथेटर काढून घ्यायचा आहे, चालताना तसा काही त्रास नाही, पण कोणीतरी बरोबर लागत. मला तुमचा रेफरन्स डॉ. पोळ यांच्याकडून मिळाला. पती खूप लवकर गेले. आई वडिलांबरोबर राहत होते. तेही हल्लीच गेले. त्यांना अल्झायमर होता, त्यामुळे सारखं बोलावं लागायचं. म्हणजे प्रश्नही आपलेच आणि उत्तरही आपलीच. त्यामुळे सारखं बोलायची सवय लागली. वडिलांचं नाव डॉ. प्रभू, लालबागला डिस्पेन्सरी होती. आता मला त्याच्या मराठीत बोलण्याचं कोड उलगडलं.
आता माझी चौकशी सुरु झाली. मी कुर्ल्यात राहतो सांगितल्यावर कुर्ल्यातले काही कॉमन रेफरन्स मिळत गेले. इस्पितळात गेल्यावर कोरोना इफेक्ट मुळे सगळी प्रोसेजर झाली. डॉक्टर उशिरा येणार होते त्यामुळे पुन्हा गप्पा सुरु झाल्या. मॅडमची मुलगी सध्या सिंगापूरला आहे हे कळलं. माझ्या मुलाची, बायकोची चौकशी झाली. डॉक्टर आल्यावर मॅडमची सगळी प्रोसिजर पूर्ण झाली. मॅडम माझी सगळ्यांशी ओळख करताना देवदूत म्हणून करून देत होत्या. मला एकदम अवघडल्या सारखं वाटत होत. निघताना मॅडमनी माझ्या कडून घरी यायचं प्रॉमिस घेतलं. गाडीतून उतरताना मला मिठी मारून त्यांनी आभार मानले. घराजवळ भेटलेल्या एका व्यक्तीशी त्यांनी माझी ओळख मुलगा म्हणून करून दिली. आता मलाही अगदी भारावून आलं. त्याच्या बरोबर एक फोटो काढून घेतला. मॅडमनी घरी येण्याचा पुन्हा एकदा आग्रह केला आणि तेही बायको मुला सोबत. पुन्हा भेटायचं वाचन देऊन तिथून निघालो.
जनकल्याण समितीचे काम करत असताना असे अनुभव खूप येतात आणि म्हणूनच हे काम करत असताना एका वेगळ्याच अनुभूतीचा आनंद मिळतो.