यशस्वी कहाणी ठाणे - जिल्ह्यातल्या कुषोषण मुक्तीची

SourceRSS JANKALYAN SAMITI    Date04-Jun-2016























राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘जनकल्याण समिती’तर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक सेवाकार्य प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा आणि अभिनव, आगळा-वेगळा प्रकल्प म्हणजे ‘पूरक-पोषक आहार’ प्रकल्प. मुंबईपासून केवळ शंभर किलोमीटर अंतराच्या आसपास असलेल्या ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर जिल्ह्यातील) वनवासी बांधव पिढ्यानपिढ्या अंधःकारमय जीवन जगत आहेत. एकतर दुर्गम प्रदेश त्यात गरिबी, बेरोजगारी, शिक्षण-आरोग्य इ. मुलभूत सुविधांची वानवा, अज्ञान-अंधश्रद्धा, व्यसनांचा विळखा अशी भयंकर परिस्थिती असणार्‍या या भागात जनकल्याण समिती तसेच रा. स्व. संघाच्या अनेक ध्येयवादी कार्यकर्त्यांनी स्वतःहून मोठ्या प्रमाणात सेवा कार्य उभी केली आहेत.

या भागातील सर्व समस्यांवर विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी काम सुरू केले आणि त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यशही आले. शिक्षण क्षेत्रातील ‘फिरती वैज्ञानिक प्रयोगशाळा’ इथपासून ते आरोग्य क्षेत्रातील पूरक-पोषक आहार’ प्रकल्पांपर्यंत... अशी या सेवाकार्यांची भलीमोठी यादी सांगता येईल. प्रत्येक प्रकल्प राबवताना जिद्द, ध्येयवाद, अभिनव कल्पनांचा प्रभावी वापर आणि शिस्त, उत्तम समन्वय यांचा जणू वस्तुपाठच ‘जनकल्याण समिती’च्या सेवाकार्याने समोर ठेवला आहे.

वनवासी भागातील अनेक समस्यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे कुपोषण. गावांमध्ये अगदी प्राथमिक आरोग्य सुविधांचीही वानवा आणि त्यातच गरिबी, आरोग्याबद्दल प्रचंड अज्ञान यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. या भागात काम उभे करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ कार्यकर्ते (कै.) मुकुंदराव पणशीकर आणि अन्य कार्यकर्त्यांना या प्रश्‍नावरील चिंतनात ‘पूरक पोषक आहारा’ची कल्पना सुचली. कुपोषणग्रस्त गावांमध्ये, वस्त्यांमध्ये पोषक आहाराबद्दल, आरोग्याबद्दल जागृती निर्माण करावी आणि कुपोषण कमी होण्यासाठी पूरक आहार पुरवावा, अशी ही कल्पना होती. 

या कामाला सन २००५ मध्ये सुरुवात झाली. प्रारंभी गावागावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. समस्या नेमकी काय आहे?, तिची कारणे काय आहेत? आणि या समस्येवर कसा तोडगा काढता येईल, यावर बराच विचारविनिमय झाला. सुरुवातीला जव्हार, शहापूर व मुरबाड हे तालुके प्रत्यक्ष कार्यक्षेत्र म्हणून निवडण्यात आले. जव्हारमधील पाच गावे तर शहापूर, मुरबाडमधील प्रत्येकी एक गाव पूरक पोषक आहार योजनेसाठी निवडण्यात आले. ‘जनकल्याण समिती’चे तत्कालीन प्रांत कार्यवाह डॉ. अनंत कुलकर्णी यांनी या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली आणि कामाचा प्रारंभ झाला.

प्रारंभी गावातील स्त्रिया आणि त्यांची बालके यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बालकांच्या शरीरातील ज्या घटकांच्या कमतरतेमुळे कुपोषणाची शक्यता असते, त्या घटकांनी युक्त असा आहार स्त्रियांना आणि मुलांना देण्याचे ठरविण्यात आले. शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा यात विचार करण्यात आला. मुगाच्या डाळीची खिचडी आणि राजगिरा लाडू यांचा पूरक पोषक आहारात समावेश करण्यात आला. प्रत्येक गावात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकी एक महिला निवडण्यात आली. तिला ‘बालसेविका’ असे नाव देण्यात आले. या बालसेविकांना पोषक आहार, आरोग्य, प्राथमिक उपचार इ. बाबत सुरुवातीला पंधरा-वीस दिवस प्रशिक्षण देण्यात आले. मग या बालसेविका गावांत प्रत्यक्ष काम करू लागल्या. प्रारंभी हास्यास्पद आणि हेटाळणीचा, चेष्टेचा विषय ठरलेल्या या पूरक पोषक आहार प्रकल्पाला थोड्याच दिवसात भरभरून प्रतिसाद मिळू लागला. कोकणपाडा, वडपाडा, माडपाडा, माळघर, दापटी, रूइपाडा, मधोळवाडी, रोडओहळ या आणि अशा अनेक पाड्यांवर, वाड्या व वस्त्यांवर आज या पूरक पोषक आहार योजनेचे भक्कम जाळे उभे राहिले आहे.

मागील दशकभरात उत्तम प्रकारे हा ‘पूरक पोषक आहार प्रकल्प’ ‘जनकल्याण समिती’व्दारे राबवला गेला आहे आणि आजही तो प्रभावीरीत्या सुरू आहे. या कामाची मोठ्या प्रमाणावर दाखल घेतली जात आहे. प्रकल्पाने पोषक आहार वाटपाच्या पुढे जाऊन आरोग्यविषयक जागृती संदर्भात आणखी अनेक विषयांमध्ये काम केले आहे. वनवासींमध्ये अनेक समस्या अज्ञानातून, अंधश्रद्धांतून उद्भवतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला आहे. बालविवाह, प्रसुती रूग्णालयात न करणे, अशुद्ध पाणी, व्यसने याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम पाडे आणि वाड्या-वस्त्यांवर केले जात आहे.

वनवासी भागात मुबलकपणे आढळणाऱ्या अनेक रानभाज्या या आहारातील आवश्यक तत्त्वांनी अत्यंत समृध्द असतात आणि बर्‍याच वेळा शहरवासियांनाच काय तर स्थानिक वनवासी बांधवानाही याची जाणीव नसते. त्यासाठी मग ‘वनभाजी महोत्सवा’सारखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सगळ्या कामाला, इतक्या वर्षांच्या अविरत प्रयत्नांना आता यशही मिळू लागले आहे. कुपोषणाची समस्या आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यातील रोगराईचा विचार करता तिचे प्रमाण आता पूर्वीच्या तुलनेत १० टक्क्यांवर आले आहे. ‘पूरक पोषक आहार प्रकल्प’ आणि त्याद्वारे राबवल्या गेलेल्या इतक्या सेवाकार्यांच्या यशाची ही पावतीच आहे. सध्या डॉ. विक्रम मुंगी हे या प्रकल्पाचे पूर्णवेळ काम पाहत आहेत. आजवरच्या या आणि अशा विविध प्रकल्पांमधून मिळालेल्या यशाचे पाठबळ घेऊन ‘जनकल्याण समिती’ अशीच जिद्दीने, अविचलपणे काम करत वाटचाल करत आहे.