ग्रामीण भागांची आजची स्थिती आपण सगळेजण जाणून आहोत. उदरनिर्वाहासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी शहरांकडे धाव घेणे ग्रामीण भागातील लोकांना अनेकदा अपरिहार्य बनते. शहरात उपचारांसाठी जावे लागले की, शहरात किती दिवस रहावे लागेल, हे सांगणे कठीण. डॉक्टरांकडून त्यांच्या पातळीवर उपचार सुरू असतात. मात्र या कालावधीत रुग्णाबरोबर हॉस्पिटलमध्ये राहणाऱ्या, रुग्णासाठी ये-जा करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांपुढे अनेक प्रश्न उभे राहतात. मुख्यत्वे त्यांचे जेवणाचे हाल होतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही तरी करणे आवश्यक होते. यावर उपाय शोधण्याची सूचना व आग्रह रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. श्री. भैय्याजी जोशी यांनी नाशिक भेटीदरम्यान केला होता. ही सूचना लक्षात घेऊन नाशिकचे श्री. राजेंद्र व सौ. ईलाताई जोशी यांनी सन 2002 मध्ये या समस्येवर उपाय शोधला आणि एका वेगळ्या सेवाकार्याला नाशिकमध्ये सुरुवात झाली...
गेली 14 वर्षे अविरतपणे रुग्ण व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी 'अन्नपूर्णा योजना" अव्याहतपणे सुरू आहे. आजपर्यंतच्या या सेवा प्रवासात 15 हजारांहून अधिक रुग्णांच्या नातेवाईकांनी या सेवाकार्याचा लाभ घेतला आहे. ग्रामीण आणि वनवासी भागातून नाशिकला उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या जेवणाची सोय या योजनेत करण्यात येते.
त्र्यंबक रोडवरील नाशिक सिव्हिल हॉस्पिटल, आरटीओ कॉर्नरवरील कॅन्सर हॉस्पिटल आणि म्हसरूळ येथील टी. बी. सेनोटोरिअल या तीन रूग्णालयांमध्ये ही सेवा सुरू आहे.
हे सेवाकार्य चालविणे एकट्या-दुकट्याचे काम नव्हते. या योजनेत रोज 125 घरांमधून डबे गोळा करून ते रुग्णांच्या नातेवाईकांना दिले जातात. योजनेची आवश्यकता लक्षात घेऊन तीन हजार नाशिककर कुटुंबीयांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. दरमहा 3 हजार घरांमधून महिन्याच्या ठरलेल्या तारखेला डबा घेतला जातो. आठ पोळ्या आणि भाजी असे या डब्याचे स्वरुप असते. याशिवाय ज्यांना उत्स्फूर्तपणे मदत करायची आहे, असे लोक देखील मदत केंद्रावर डबे आणून देतात. शहरातील विविध भागातील 10 गटप्रमुख रोज दहा ते बारा घरांमधून हे डबे गोळा करण्याचे काम करतात. एकूण योजनेत 125 गटप्रमुख सहभागी झाले आहेत आणि वर्षभर ते मोठ्या मेहनतीने ही व्यवस्था सांभाळतात. या सर्वांच्या मेहनतीचा परिपाक म्हणून या योजनेतून दररोज सुमारे सव्वाशे ते दीडशे नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. 'जनकल्याण समिती"च्या या सेवाकार्यातील सेवाभाव लक्षात घेऊन सिव्हिल हॉस्पीटल व्यवस्थापनाने ओपीडी गेटसमोर नातेवाईकांच्या भोजन व्यवस्थेसाठी एक हॉल देखील उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे या सेवाकार्याच्या पुढे जाऊन रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी नाते तयार होते, असा अनुभव आहे. म्हणूनच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आगळीवेगळी दिवाळी आणि रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो. दिवाळीत पुरुष रुग्णांना शर्ट, पॅन्ट, तर महिलांना साडी, ब्लाऊज अशी भेट दिली जाते. शिवाय उटणे, तेल, कंगवा आणि चिवडा- लाडू, मिठाई अशा प्रकारचे साहित्य असलेल्या भेटवस्तूंचा संचही सर्व रुग्णांना दिला जातो.
नाशिक जिल्हा रुग्णालयात 'अन्नपूर्णा योजने"चे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून श्री. विकास माकुणे आणि सौ. विद्या विकास माकुणे काम करतात. हे काम करताना त्यांना अनेकविध अनुभव आले. प्रकल्पाची गरज आणि सार्थकर्ता असे अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. मनात सेवाकार्याची ज्योत चेतविणारे काही निवडक अनुभव 'अन्नपूर्णा योजने"तील पूर्णवेळ कार्यकर्ते विद्या आणि विकास माकुणे (भ्रमणध्वनी 9422048328, दूरध्वनी - 0253- 2598746) यांच्या शब्दांतून...
000
''नाशिक जिल्हा रुग्णालयात 'अन्नपूर्णा योजने"चे काम करत असताना एक समस्या दिसली. जे रुग्ण रुग्णायात दीर्घ काळ (3/4 महिने) राहतात, त्या रुग्णांचे केस कापले जात नाहीत. त्यांची दाढी केली जात नाही. मनात आले, मी हे काम करू शकेन का...? हा विचार मनात आल्यावर प्रथम मी स्वतःच दुकानात गेलो आणि तीन महिने रोज दोन-तीन तास दुकानदाराकडून हे काम शिकलो. मग दररोज एका रुग्णाचे केस कापण्याचे, दाढी करण्याचे काम करण्यास सुरुवात केली. या कामाला आधी खूप वेळ लागत असे. नंतर सरावाने व्यवस्थित आणि कमी वेळेत अधिक संख्येने रुग्णांचे केस कापण्याचे, दाढी करण्याचे काम चांगले जमू लागले. मी हे काम करत असताना तेथील कर्मचारी देखील हे काम पहायचे. काही महिन्यां नंतर एक कर्मचारी श्री. विजय भोसले यांनी मला विचारले, 'हे काम मी पण करू शकेन का?" मी 'हो" म्हणालो. मग ते देखील हे काम करू लागले. काही दिवसांनी 'तुम्ही केस कापण्याचे काम दुकानात जाऊन शिकून घ्या" असे मी त्यांना सांगितल्यावर दोन महिने दुकानात जाऊन ते हे काम शिकले. मग आम्ही दोघे मिळून हे काम करू लागलो. पुढे असेच एकाचे दोन झाले. हे काम आता व्यवस्थितपणे सहा कर्मचारी रुग्णांकडून पैसे न घेता, मनापासून करत आहेत. मला या कामात आता लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे आता मी अन्य समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे.""
000
''नांदगाव येथील अनिल सीताराम पवार हा वीस-बावीस वर्षांचा तरुण गाडीच्या अपघातात पायाला लागल्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन-तीन महिने भरती होता. मला नेहमी 'ताई तुझं बाळ कसं आहे?" असे विचारत असे. एक दिवस त्याला रक्त पिशवी लावलेली पाहून मला वाईट वाटले. मी विचारले 'कारे तुला रक्त चढवावं का लागतयं." तर त्याची आई म्हणाली, 'तो जेवतच नाही." त्याक्षणी अनिल मला म्हणाला, 'ताई, तू रोज येेत जा नां. मला तू भरवलंस तर मी रोज जेवेन. मला इथलं जेवण जात नाही." ते ऐकून खूप बरे वाटले. मी त्याला म्हटले, 'ठीक आहे. मी तुला जेवू घालेन." हे ऐकताच तो खूप आनंदित झाला. पुढे पंधरा दिवसात काळाने घात केला आणि अनिल देवाघरी गेला. पण आमच्यातल्या वेगळ्या भाऊ-बहिणीच्या नात्याची आठवण मनात कायम ठेऊन गेला.""
000
''मोहन गावित हा अस्थिरोग कक्षात भरती होता. त्याची आई बरोबर होती. त्यांना डबा देणे सुरू झाले. मोहनशी संवाद सुरू झाला. मी मोहनचा मित्र झालो. मोहन पेठ तालुक्यातला. शिक्षण बेताचेच. शेती नाही. त्यामुळे शहरात कामासाठी आला होता. बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला लागला. रात्री साईट सांभाळायचा. दिवसा सेंटिं्रगच्या कामाला जायचा. नेहमी आमचे बोलणे होऊ लागले. मित्रत्वाची वीण घट्ट झाली. एके दिवशी बोलता बोलता मोहनला विचारले, 'पैशाचे काय करतोस? गावी पैसे पाठवतोस का ?" त्यावर तो उत्तरला, "कधी कधी गावाला पैसे पाठवतो." मग मी विचारले, 'पैसे कोठे ठेवतोस?" त्यावर तो म्हणाला, 'पैसे घरीच असतात." मी त्याला विचारले, 'पैसे बँकेत का ठेवत नाहीस?" तर तो म्हणाला, 'बँकेत खूप कागद मागतात. त्यामुळे नाही ठेवत." थोड्याच दिवसात मोहनला जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. मी त्याला गाडीवर घेऊन त्याच्या घरी गेलो. घर म्हणजे काय तर एक पत्र्याची खोली होती. दरवाज्याला लाकडी खुंटी होती. मोहन चहा करतो म्हणाला, मी नको म्हणालो. नंतर त्याने गादी वर उचली आणि पाहतो तर काय...? तेथे सारे पैसेच. आम्ही ते पैसे मोजले. एक लाख 27 हजार 590 रुपये होते. मोहनची 15 वर्षांची मेहनत समोर दिसत होती. मी विचार केला. बँकेत जाऊन त्याचे खाते काढले. पासबुक मोहनला दिले आणि म्हणालो, 'हे तुझे पैसे आहेत. जेव्हा पाहिजे त्यावेळी घेत जा." मोहनचा आनंद त्याच्या डोळ्यात दिसत होता. तो पाहत मी तेथून निघालो.''
000
''नाशिक जुना सिडको भागातून दर महिन्याच्या 13, 14 आणि 15 तारखेला डबे (शिदोरी) गोळा केले जातात. श्री. नामदेव सांगळे हे महादेव मंदिराजवळ राहतात. दर 13 तारखेला त्यांचा डबा असतो. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात त्यांचा एकुलता एक मुलगा देवाघरी गेला. डबा देण्याच्या दिवशी त्याचा 11 वा दिवस होता. काका काकूनी स्वतःची शिदोरी देऊन इतरांचे डबा जमा करुन दिले. नंतर त्याच्या घरी गेलो असता काकू म्हणाल्या, 'माझा मुलगा गेला, पण रुग्णालयात माझी मुले डब्याची वाट पाहत असतात." हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. मुलगा गेल्याचे दुःख मनात असताना समाजसेवा करण्याची भावना... अशा प्रसगांमध्येही अशी आई डबे देते. त्यामुळेच आपण रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची रोज जेवणाची सोय करु शकतो, असेच म्हणावेसे वाटते.""
000
''नाशिकमधील जुना गंगापूर नाका येथे राहणारे केशव गंगाधर जाधव सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. काकू धुणी भांडी करून उदरनिर्वाह चालवायच्या. घरी कोणीच नव्हते. म्हणून डबा देण्याचे काम सुरु झाले. बोलताना काकू नेहमी उत्साही दिसायच्या. रूग्णालाही उत्साहित ठेवण्याचा प्रयत्न करायच्या. एक-दीड महिन्यात जाधव यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. काही दिवसांनी आम्ही दोघे आणि मुलगी जनकल्याण रक्तपेढीत काही कार्यक्रमासाठी जात होतो. रिक्षेतून उतरताना काकू दिसल्या. अगदी तशाच नेहमी सारख्या. मी हाक मारून त्यांना थांबवले. काकू थांबल्या. मी जवळ जाताच त्या रडू लागल्या. मला कळेना काय झाले तरी काय. मग शांत होत त्यांनी काकांचे निधन झाल्याचे सांगितले. मला वाईट वाटले. त्यांचा संसार आठवला. ती परिस्थिती आठवली. मी त्यातून बाहेर येईपर्यंत त्या सावरल्या होत्या. मग माझ्या मुलीच्या हातात त्यांनी दहा रुपये दिले आणि तिला म्हणाल्या, 'हे तुला आजीकडुन बरं का?" मग मला म्हणाल्या, 'खाऊ घे तिला. खाऊ घाल माझ्या नातीला." असे म्हणत त्या निघाल्या आणि जाता जाता परत आल्या. त्यांनी मला विचारले, 'दहा डबे द्याल का?" मी 'हो" म्हणताच त्यांनी माझ्याकडे 200 रुपये दिले. मी देणगीची पावती दिली. काकू निघून गेल्या. थक्क होऊन आम्ही काकूंकडे कितीतरी वेळ पाहात राहिलो होतो..."
नरेंद जोशी
अन्नपूर्णा योजना...
नाशिकमध्ये रोज 125 घरांमधून एक याप्रमाणे जेवणाचे डबे गोळा केले जातात.
हे काम रोज 10 गटप्रमुख करतात.
दरमहा तीन हजार घरांमधून डबा गोळा केला जातो.
नाशिकमधील तीन हजार कुटुंब या योजनेत डबा देतात.
डब्याचे स्वरुप- आठ पोळ्या आणि भाजी असे असते.
एकूण 125 गटप्रमुख सेवाभावी वृत्तीने हे काम वर्षभर करतात.