सेवेसाठी - आगळी देणगी

SourceRSS JANKALYAN SAMITI    Date23-May-2016


पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुल्याजवळ 20 ऑगस्ट 2006 रोजी एका चार चाकी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीत असलेल्या अशोक कुंभार यांना ‘स्पाईनल इंज्युरी’ झाली आणि त्यांच्या कंबरेखालचा संपूर्ण भाग अधू झाला. अनेक वर्षे अनेक प्रकारचे वैद्यकीय उपचार घेऊनही फरक पडला नाही. परंतु या सगळ्यावर त्यांनी मानसिकरीत्या कणखर बनून अखेर मात केलीच. व्हिलचेअरच्या साहाय्याने फिरणे, रोज किमान काही किलोमीटर चालणे हा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. परिस्थिती समोर हतबल न होता ‘जनकल्याण समिती’च्या कार्यात श्री. कुंभार हे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात व समाजसेवेत समर्पित भावनेने सहभागी झाले आहेत.

आपल्या आयुष्यात एखादा छोटा अपघात झाला तरी आपण खचून जातो. त्यातून बाहेर पडायला काहींना वर्ष लागतात, तर काही जण आयुष्यभर त्याच दु:खात मग्न असतात. श्री. आकाश कुंभार हे व्यक्तिमत्त्व मात्र या सर्वांपेक्षा वेगळे आहे, असेच म्हणावे लागेल. एका दुर्दैवी अपघातात कंबरेखालील संपूर्ण भाग अधू झालेल्या कुंभार यांनी बरे होण्याची जिद्द कधी सोडली नाही. सातत्यपूर्ण उपचार व अफाट इच्छाशक्तीच्या बळावर त्यांच्या जिद्दीला पाठबळ मिळाले आणि अथक परिश्रमांनंतर ते रोज थोडा थोडा वेळ चालू लागले.

अपघाताने ओढवलेल्या संंकटातून बाहेर पडत, आयुष्यात सरधोपट मार्गाने वाटचाल न करता कुंभार यांनी आज सेवाभावी वृत्तीचा एक आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. पॅरालेजिक रॅली, अपंगांसाठीच्या मॅरेथॉन यामध्ये भाग घेऊन मिळणारे बक्षीस किंवा त्यातून जमणारी रक्कम ते ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी देतात. ‘जनकल्याण समिती’च्या सहकार्याने त्यांचे हे आगळे समाजकार्य चालू आहे. अनेक रॅलींचे आयोजन करून त्यांनी लाखभर रूपयांची मदत आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी जमा केली आहे.

‘जनकल्याण समिती’च्या कार्याबाबत बोलताना कुंभार म्हणाले की, समाजातील तळागाळांतील गरजूंना मदत करण्याच्या दृष्टीने आज अनेक संस्था कार्यरत आहेत. ‘जनकल्याण समिती’ एका वेगळ्या ध्येयानेे महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी काम करीत आहे. माझे उद्दिष्ट आणि ‘जनकल्याण समिती’ची भूमिका यामध्ये मला एकसंधता जाणवली. त्यामुळे मी समाजकार्यात सहभागी होण्यासाठी ‘जनकल्याण समिती’ची निवड केली.

‘जनकल्याण समिती’ अतिशय प्रामाणिकपणे काम करीत असून महाराष्ट्रातील दुष्काळाचे निवारण ‘जनकल्याण समिती’ मार्फत यशस्वीरीत्या होऊ शकते, याची मला खात्री आहे. नजीकच्या काळात आणखी रॅलींचे आयोजन करून ‘जनकल्याण’च्या सहकार्याने एक गाव दत्तक घेण्याची माझी इच्छा आहे. त्या गावात उत्तम व अत्याधुनिक अशा सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचाही आमचा प्रयत्न असेल, असाही मानस कुंभार व्यक्त करतात.

- प्रथमेश नारविलकर