शाळांच्या निकालाचा तो दिवस होता. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या गर्दीने शाळा फुलल्या होत्या. हल्ली निकालाच्या दिवशी पालकांनाच खूप ताण आणि विद्यार्थी मजेत असं दृश्य असतं. यंदाही ते तसंच होतं. निकाल, अभिनंदन, कौतुक, पारितोषिकं या सगळ्या धामधुमीत पुण्यातील रेणुका स्वरूप मुलींच्या प्रशालेत यंदा एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षिका करत होत्या. ‘रा. स्व. संघ जनकल्याण समिती’ च्या दुष्काळ निवारण निधीला शक्य तेवढी मदत करा, असं आवाहन शिक्षिकांकडून पालकांना केलं जात होतं आणि या आवाहनाला पालक उत्स्फूर्त प्रतिसाद देत निधी देत होते. पण थक्क करणारे प्रसंग त्यानंतर घडले. अनेक पालक मुलीचा रिझल्ट घेऊन घरी गेले आणि पुन्हा शाळेत आले. पालक शाळेत येऊन शिक्षिकांकडे निधीची रक्कम देत होते आणि ‘मगाशी तेवढे पैसे जवळ नव्हते, म्हणून घरी जाऊन घेऊन आलो, असं आवर्जून सांगत होते.
दुष्काळाच्या झळा सर्वांनाच जाणवत आहेत. शहरांमध्ये पाणीटंचाई आहे, ग्रामीण भागात हजारो गावं टंचाईग्रस्त आहेत, पशुधन वाचवण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. एकूणात काही भागातच दुष्काळ आहे आणि काही भागात दुष्काळाची समस्याच नाही असं यंदाचं चित्र नाही. पण तरीही दुष्काळनिवारणाच्या कामासाठी निधी देण्याचं आवाहन ‘जनकल्याण समिती’ ने करताच त्याला सर्व भागातून प्रतिसाद मिळत आहे, हे निश्चितच चांगलं चित्र आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती यापूर्वीही अनेकदा उद्भभवली होती. त्या त्या वेळी दुष्काळ निवारणासाठी म्हणून जे काही उपाय करावे लागतात ते केले गेले. पण यंदा एक गोष्ट ठळकपणे दिसते आहे ती ही की, दुष्काळ निवारणासाठी तात्पुरते उपाय करून आता भागणार नाही, ही जाणीव अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. प्रत्येक गावाचा आणि तेथील परिस्थितीचा विचार करून त्या गावात जलसंधारणासाठी, पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी, मुरवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार यावेळी होताना दिसत आहे. म्हणजे तात्पुरत्या उपायांऐवजी स्थायी स्वरुपाच्या कामांचा विचार सुरू झाला आहे. लातूरमध्ये मांजरा नदी खोलीकरणाचं काम असेल किंवा ‘जनकल्याण समिती’ तर्फे ११ जिल्ह्यातील ३० गावांमध्ये सुरू असलेली जलसंधारणाची कामं असतील, अशी स्थायी स्वरुपाची कामंच त्या त्या गावांना पुढच्या अनेक वर्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. पाण्याच्या बाबतीत असाच विचार शहरांनाही यापुढे करावा लागणार आहे.
पाणीपुरवठा करताना पाण्याची गळती होतेच, अशी प्रशासनाची मानसिकता असल्याचं चित्र बहुतेक सर्व ठिकाणी दिसतं. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. मोठ्या शहरांमध्ये गळतीचं हे प्रमाण ४० टक्के इतकं आहे, यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यावं. त्यामुळे शहरांमध्ये पाण्याची गळती थांबवणं आणि पाण्याचा वापर काटकसरीनं करणं याला या पुढच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व द्यावं लागेल. अनेकदा असं होतं की, जून-जुलैमध्ये पाऊस आला, दुष्काळ संपला की या साऱ्या गोष्टी विसरल्या जातात आणि मग पुढच्या मार्च महिन्यात पुन्हा सर्वांना जाग येते. म्हणून ‘जलजागृती’ साठी जसे प्रयत्न सध्या सुरू आहेत, तसे प्रयत्न वर्षभर सातत्याने करावे लागतील. हा फक्त उन्हाळ्यातील विषय आहे, असं आपण समजत राहिलो तर मग ती निश्चितच मोठी चूक ठरेल.
जलसिंचनाच्या क्षेत्रात ज्यांचं फार मोठं योगदान आहे, अशा दि. मा. मोरे यांचं नुकतच पुण्यात व्याख्यान झालं. या व्याख्यानात त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला तो असा की... पावसाचं गणित मांडणं अवघड आहे. म्हणून पाऊस किती पडला यापेक्षा तो किती जतन केला आणि किती ‘ विवेका ’ नं वापरला हे पाहणं महत्त्वाचं आहे. पाणी वापराबाबत तंतोतंत या शब्दाचा अंगीकार केला गेला पाहिजे. पाणीसाठे निर्मितीबाबत काम झालं असलं, तरी पाणी वापराबाबत मात्र आपल्याकडे काम झालेलं नाही. पाण्याबाबतचं आपलं आचरणच बदलायला हवं... मोरे यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेलं हे विचारांचं सार सर्वांनीच मनन करावं असं आहे.
पाण्याचा वापर किती ‘ विवेका ’नं झाला याचा विचार प्रत्येकानं स्वतःपासून सुरू करणं, ही आजची खरी गरज आहे. ही जाणीव काही प्रमाणात निर्माण होत आहे आणि त्याचं प्रत्यंतरही अनेक घटना-प्रसंगांमधून येत आहे. ही जाणीव टिकवणं, वाढवणं आणि अनेकांमध्ये ती निर्माण करणं याला यापुढे खूप महत्त्व द्यावं लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. मुळात संवेदनशीलता महत्त्वाची आहे. म्हणून उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा आणि माध्यमांचा वापर करत समाजातील संवेदनशीलता जागी करण्याचं काम प्रत्येकाला करावं लागेल. त्यातूनच अनेक चांगली काम सहज उभी राहू शकतील. चला... या दिशेनं काही कृती सुरू करूया...
- शैलेंद्र बोरकर
(संपर्क: ९४२२०८५९४२)