भारतभूमीला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून, प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन अविरतपणे काम करणारी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. संघाच्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण झाली.
तेजस्वी, गतिशील व सक्षम अशा संघटनेची निर्मिती, समाजाच्या बाबतीत संवेदनशील, राष्ट्राच्या बाबतीत जागरूक व सक्रिय अशा व्यक्तींची जडणघडण संघ दैनंदिन शाखेच्या माध्यमातून करते...आणि या सिद्धतेच्या आधारावरच संघ कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती व विशेष परिस्थितीचा सामना करण्यास नेहमी सज्ज असतो. या सज्जतेची ओळख म्हणजेच जनकल्याण समिती.
पूर्वपीठिका
१९७२ सालच्या दुष्काळाने महाराष्ट्रावर मोठे संकट ओढावले होते. निसर्गाने अन्नासाठी अनेकांची दुर्दशा केली होती. अशा भीषण संकटाचा सामना शासनाने एकट्याने करणे शक्य नाही. सामाजिक संस्थांनी या आव्हानांचा सामना करण्यासाठी राज्य शासनासोबत उभं राहावं... असं आवाहन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केलं. संघाने अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी कधी आवाहनांची वाट पाहिलीच नाही... मात्र या दुष्काळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - दुष्काळ निवारण समितीची स्थापना झाली. या समितीने दुष्काळाचा सामना करताना राज्यात प्रत्येक गावापर्यंत हरेक प्रकारची मदत केली, या मदतीत समाजातील प्रत्येक घटकाचं साहाय्य घेतलं.
मात्र हे काम इथंच थांबलं नाही. नैसर्गिक वा मानवनिर्मित
आपत्ती व विशेष परिस्थितीचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनातून दुष्काळ निवारण समितीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - जनकल्याण समितीचे रूप धारण केले.
संवेदनशील सेवाकार्य
जनकल्याण समितीने १९७२ सालच्या दुष्काळानंतर अनेकविध आपत्तींचा सामना करीत सेवाकार्यात अनेक स्वयंसेवकांच्या मदतीने वाहून घेतलेले आहे. या सेवाकार्यात १९९३ साली झालेला किल्लारीचा भूकंप, २००६ साली गुजरात कच्छमधील भूकंप, बिहारमधील पूरस्थिती, ओरिसातील वादळ, २०१२ मध्ये तामिळनाडू आलेली त्सुनामी, २०१३ मधील महाराष्ट्रातील दुष्काळ आणि उत्तराखंडमधील महाप्रलयाच्या वेळी भरीव असे मदत व सेवाकार्य जनकल्याण समितीने केले. आज जनकल्याण समितीची सज्जता अक्षरशः महाराष्ट्रासह देशभरात आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र सामना करीत असलेल्या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी व पशुधनांच्या अस्तित्वासाठी कसोशीने सेवाकार्यांची पराकाष्ठा सुरू आहे.
केवळ सेवाकार्यांवर न थांबता जनकल्याण समितीने संस्कार केंद्र, वसतिगृह, रुग्णालये, रक्तपेढ्या, रूग्णोपयोगी साहित्य केंद्र, बहुविकलांग पुनर्वसन केंद्र, किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण, वाचनालये अशी अनेकविध सेवाकार्य शहरी भागात तर फिरती विज्ञान शाळा, वनवासी बांधवांसाठी गणेशोत्सांसारखे उत्सव, दुर्गम भागात आरोग्य सेवा देणारे ग्राम आरोग्य रक्षक, भाऊबीज भेट, शाश्वत शेती, जलसंधारण, कृषी मार्गदर्शन आदी प्रकल्प ग्रामीण भागात राबविण्यात येत आहेत.
चला करूया ‘सेवा, संवेदनां’चे अभिसरण...
आज जनकल्याण समिती १ हजार ४०० सेवांमध्ये कार्यमग्न आहे. समाजात अशा संस्था आणि व्यक्ती आहेत. ज्या समान ध्येयाने वाटचाल करीत आहेत. त्या लोकांपर्यंत या कार्याची माहिती पोहचावी. त्यांनाही या कार्यात सहभागी होता यावं आणि जनकल्याण समितीचा या समर्पित वृत्तीने सुरू असलेल्या सेवाकार्याच्या यज्ञात आहुती देणाऱ्या असंख्य स्वयंसेवक, देणगीदार, हितचिंतक नागरिक बंधू भगिनींपर्यंत हे काम पोहचावे यासाठी आम्ही या संवादपत्राचा खटाटोप.
काळ बदलला, लोकांच्या अपेक्षा, अभिव्यक्त होण्याची माध्यमही बदलली. `सोशल मिडिया`व्दारे ही क्रांती घडून आली. सेवाकार्याची संवेदना, त्याप्रती समर्पित भाव कायम ठेवून काळानुरूप बदल स्वीकारणं हा जनकल्याण समितीचा स्थायिभाव. आणि त्याच भूमिकेतून आता ‘माहितीच्या महाजंजालात’ सेवाकार्याची माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहचावी या उद्देशाने ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून ही संवादसत्र सुरू करीत आहोत. आपण याला प्रोत्साहन आणि सेवाकार्यात सहभागी होऊन प्रतिसाद द्याल, अशी खात्री आम्हाला आहे.
जनकल्याण समितीतर्फे चालविली जाणारी सेवाकार्य, प्रकल्पांची माहिती, सद्यःस्थिती, त्यामुळे झालेले सकारात्मक परिवर्तन, मदतकार्यातून पुन्हा उभा राहिलेली आणि बदललेली आयुष्ये, यशकथा अशा अनेक गोष्टी आपल्यापर्यंत या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न होणार आहे..
चला तर मग आपणही संवेदनाचा हा जागर समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवूया...