सेवाव्रतीशी संवाद

SourceRSS JANKALYAN SAMITI    Date27-Apr-2016

रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पाने नुकतीच पंचवीस वर्षं पूर्ण केली. या प्रकल्पामध्ये पंचवीस वर्षं पूर्णवेळ कार्यरत असलेले शिक्षक-कार्यकर्ते श्रीरंग पिंपळीकर यांच्याशी झालेला संवाद...

जनकल्याण समितीच्या फिरती विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. या प्रकल्पामागची मूळ संकल्पना आणि हेतू काय होता ?

विश्‍व हिंदू परिषदेमार्फत तेव्हाच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यातील तळासरी येथे वनवासी विकास प्रकल्प चालवण्यात येतो. या प्रकल्पाचे संस्थापक, एक ध्येयनिष्ठ संघकार्यकर्ते कै. माधवराव काणे यांनी अनेक वर्षं त्या भागात काम केलं होतं. त्या भागाच्या विकासासाठी, वनवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी बरंच चिंतन केलं होतं. शैक्षणिक विकासासाठी काम करत असताना त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले होते. या सार्‍या चिंतनातून फिरत्या प्रयोगशाळेची कल्पना त्यांना सुचली. प. पू. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं (सन 1988-89) भारतभर संघाची सेवाकार्ये उभारावीत अशी योजना होती. त्यानुसार महाराष्ट्रातील वनवासी भागात जनकल्याण समितीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काही सेवाकार्ये सुरु करावीत अशी योजना करण्यात आली होती. मग त्यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना, ज्यांना वैज्ञानिक प्रयोगशाळा वगैरे गोष्टी ठाऊकच नाहीत, त्यांना विज्ञानाची गोडी लागावी, शाळांना व शिक्षकांना विज्ञान अध्यापनात मदत करावी आणि गावागावात चांगला संपर्क निर्माण व्हावा या उद्देशांतून प्रयोगशाळेच्या उपक्रमाला 1990 मध्ये सुरुवात झाली.

या प्रकल्पा बाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि गावातील सामान्य नागरिकांचा सुरुवातीचा प्रतिसाद कसा होता ? कोणकोणत्या भागांमध्ये हा प्रकल्प पोहोचला ?

त्या काळात ग्रामीण, वनवासी भागात संघकार्याला विरोध असायचा. फिरत्या प्रयोगशाळेची कल्पना व त्यासंबंधीचा अहवाल वगैरे घेऊन आम्ही जेव्हा शाळांकडे गेलो, तेव्हा त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकार्‍याची परवानगी घेण्यास सांगितले. शिक्षणाधिकार्‍यानी कागदावरील रा. स्व. संघ नाव वाचूनच प्रकल्पाला नकार दिला. पण नंतर अहवाल सविस्तरपणे वाचल्यावर त्यांनी हे खरं तर आमचं काम आहे. ते तुम्ही करतायं ंंआणि तेही विनामोबदला, असं म्हणत काही महिन्यांसाठी परवानगी दिली. प्रकल्प चालेल की नाही याची धाकधूक त्यांना होती. पण पहिल्याच प्रयोगापासून आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त सफलता मिळत गेली. आयुष्यात प्रथमच वैज्ञानिक प्रयोग पाहणारी ती मुलं अक्षरशः तहानभूक विसरून प्रयोग पाहत होती. त्यांच्यात हळू हळू विज्ञानाची आवड निर्माण होऊ लागली. बर्‍याच शिक्षकांनीदेखील कधी प्रयोग पाहिले नव्हते. त्यांच्याकडून वारंवार आमंत्रणं मिळू लागली. पहिल्या वर्षातच 110 शाळांतील साडेअकरा हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. पण त्यातून प्रत्येक ठिकाणच्या अध्यापनासाठी मिळणारा वेळ कमी होऊ लागला. त्यामुळे पुन्हा कार्यपद्धतीवर विचार झाला आणि कमी काम झालं तरी चालेल, पण ते गुणवत्तापूर्ण असायला हवं, या हेतूनं शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील प्रत्येकी 10 शाळांची निवड केली. त्यामुळे पुरेसा वेळ मिळू लागला. या फिरत्या प्रयोगशाळेची सगळीकडे चर्चा होऊ लागली होती. शाळेतली मुलं तर फारच प्रभावी झाली होती. त्यातून मग शिबिराची कल्पना सुचली. त्या भागात लहान मुलांचं कोणत्याही विषयाचं निवासी शिबीर ही कल्पनाच नवीन होती. पण त्यालाह खूप मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरातील सूर्यनमस्कार, योगासने, नियुद्ध, खेळ, बौद्धिक, पद्य, प्रार्थना, एकात्मता मंत्र हे सगळं मुलांना फारच आवडलं. शिक्षक, पालकही प्रभावित झाले. विज्ञान दिंडी सारखे उपक्रमही पुढे सुरु झाले. या सगळ्या उपक्रमांचं परिसरा कौतुक होऊ लागलं.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम वाढत असताना राजकीय क्षेत्रातील मंडळींची प्रतिक्रिया कशी होती ? कुठे विरोध झाला का ?

आधी सांगितल्याप्रमाणे हा भाग संघकार्याला तितका अनुकूल नव्हता. विरोधाचं वातावरण होतं. प्रयोगशाळेबद्दल ऐकल्यावर संघविरोधी विचारांच्या अनेक नेतेमंडळींकडून विरोध झाला होता. हे लोक मुलांना धार्मिक गोष्टी, जातीयवाद इ. शिकवतील, मुलांमार्फत गावात राजकीय पक्षाचा प्रचार करतील अशी नेहमीची भीती ते मनात धरून बसले होते. काहीजण तर प्रकल्प बंद करायलादेखील निघाले होते. असेच त्या भागातील एक प्रतिष्ठित नेते प्रयोगशाळा बंद करण्यासाठी एका शाळेत आले होते. पण शाळेत आल्यावर खिडकीतून त्यांनी आत पाहिलं तर शिक्षक वैज्ञानिक प्रयोग दाखवत आहेत... मुलं आणि शिक्षक शांतपणे ते पाहत आहेत... असं चित्रं त्यांना पहायला मिळालं. ते स्वतः देखील प्रयोग संपेपर्यंत बाहेर उभं राहून पाहत राहिले आणि प्रयोग संपल्यावर ते भेटून म्हणाले, या भागात काम करत असताना कुठे काही अडचण आली, तर माझं नावं सांगा... आणि काहीही मदत लागली तर ताबडतोब मला हाक मारा !!
अशाप्रकारे हळूहळू विरोध मावळत गेला आणि पुढे तर या राजकीय नेत्यांचीच मुलं-मुली, नातेवाईक शिबिरांमध्ये सहभागी होऊ लागले ! संघ कार्यकर्त्यांचं गावोगाव जोरदार स्वागत होऊ लागलं.

फिरती विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाची ही गेली पंचवीस वर्षांची वाटचाल फारच स्तुत्य आणि रंजक आहे. हा प्रकल्प आज कोणकोणत्या भागात पोहोचलायं ? त्याचं आजचं स्वरूप कसं आहे ?

पंचवीस वर्षांत प्रकल्पाचा विस्तार खूपच चांगला झाला आहे. वनवासी भागात संघाचं काम चांगलंच रुजलंय. शाळांतील विज्ञान अध्यापनाला गती मिळाली आहे. गावकर्‍यांनी मुद्दाम मागणी केल्याने अन्य उपक्रम उदा. चारसूत्री भाताची लागवड, विज्ञान सहली, किशोरी विकास प्रकल्प, मातृप्रबोधन वर्ग, पूरक पोषक आहार योजना इ. अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले आहेत. प्रयोगशाळेचं नाव सर्वत्र पोहोचल्यावर इतर जिल्ह्यांमधूनही या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात ढोरगाव, रत्नागिरीत गुहागर, संगमेश्‍वर, कोळथरे, सिंधुदुर्गात देवगड, नाशिकमध्ये त्रंबकेश्‍वर, पेठ, जालन्यात भोकरदन अशा अनेक ठिकाणी प्रयोगशाळेचा उपक्रम पोहोचला. या सर्व ठिकाणी प्रकल्प समित्या आहेत, अल्प मानधनावर मेहनत घेऊन काम करणारे ध्येयनिष्ठ शिक्षक आहेत. सध्या महाराष्ट्रात एकूण 9 प्रयोगशाळांमार्फत 244 शाळांमध्ये काम सुरू आहे आणि सुमारे 25 हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत, हे सांगताना फार मोठं समाधान वाटतं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, विजय भटकर, पी. के. जोशी, कै. वसंत गोवारीकर यांच्यासारख्या दिग्गजांनी प्रकल्पाचं कौतुक केलं आहे. विद्यमान राज्यपाल मा. विद्यासागर राव यांच्याकडूनही कौतुक व शुभेच्छा मिळाल्या आहेत.

इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना काय वाटतं ? या वाटचालीतील लक्षात राहिलेले काही प्रसंग जाणून घ्यायला आवडेल...

पंचवीस वर्षांत आम्ही अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवले आहेत. सुरुवातीच्या काळातील एक प्रसंग मी नेहमी सर्वाना सांगत असतो. एकदा असंच वनवासी भागातील शाळेत वर्गात प्रयोग शिकवत असताना कुठल्याशा एका प्रयोगात एका लहान आकाराच्या वस्तूचं उदाहरण द्यायचं होतं. तर मी पटकन पेढ्याचं उदाहरण दिलं. तर समोरच्या काही विद्यार्थ्यांचा चेहरा कोड्यात पडल्यासारखा झाला. ते विद्यार्थी मला म्हणाले, सर, आत्ता काय म्हणालात तुम्ही ? मी सहजपणे म्हणालो की अरे असं काय करतायं... आपला पेढा असतो की नाही खायचा... त्यावर ती मुलं म्हणाली की सर खरंच तुम्ही हे जे काही म्हणतायं ते आम्हाला माहिती नाही... आम्ही पहिल्यांदाच हे ऐकतो आहोत ! मुलांचं ते उत्तर आणि ते चेहरे पाहून मागासलेपण किती भयानक असू शकते आणि आपण त्याबद्दल किती अनभिज्ञ असतो याची जाणीव आम्हाला झाली !
काही प्रसंग अत्यंत समाधान देऊन गेले. गेल्या वर्षी 1 मार्च रोजी एका विद्यार्थ्याचा फोन आला. प्रमोद भावार्थे त्याचं नाव. मुरबाड तालुक्यातील त्या विद्यार्थ्याला 1991 साली तो पाचवीत असताना मी प्रयोग शिकवले होते. त्या दिवशी फोन करून तो मला म्हणाला, सर, आज मुंबई विद्यापीठात माझा मेरीटवर पीएच.डी. साठी नंबर लागला ! या प्रमोदचाच पूर्वी एम. ई. ला विद्यापीठात प्रथम क्रमांक आल्यावर त्याचा मला फोन आला होता. अशा अनेक विद्यार्थ्यांचे आजही फोन येतात. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी संशोधक झालेला असतो. आयुष्यात यश मिळवून जेव्हा विद्यार्थी असे दहा-पंधरा वर्षानंतर आठवणीने फोन करतात, भेटतात तेव्हा खूप समाधान वाटतं.

पिंपळीकर सर, हे काम इतकी वर्षं तुम्ही करत आहात. या सेवाकार्याशी तुम्ही पूर्णपणे एकरूप झालेला आहात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर याचा परिणाम कसा झाला ? तुमच्या घरातून या कामाला कसा पाठींबा मिळाला ?

मुळात मी आधी संघ प्रचारक राहिलो होतो. त्यामुळे घरापासून लांब, दूर कुठेतरी दुर्गम भागात संघाचं काम कसं असतं याची मला, माझ्या घरच्यांना चांगली जाणीव होती. मध्ये काहीकाळ मी नाशिक येथे नोकरी करत होतो. त्यानंतर सरकार्यवाह मा. भैयाजी जोशी यांच्या माध्यमातून जनकल्याण समितीच्या या प्रकल्पात मी सहभागी झालो. इतकी वर्षं काम केलं. जेव्हा लग्न झालं तेव्हाही सांपत्तिक स्थिती बेताचीच होती. पण माझी पत्नी राष्ट्र सेविका समितीचं काम करत असल्याने तिलाही या सगळ्याची कल्पना होतीच. तिने इतक्या वर्षांच्या या धावपळीच्या, दगदगीच्या कामात मला खंबीरपणे साथ दिली. बर्‍याच वेळा शिबिरांच्या व्यवस्थांमध्ये तिनेही सहभाग घेतला. या सेवाकार्यात आनंद मानला. तिच्यामुळेच मी इतकी वर्षं हे काम नेटानं आणि आनंदानं करू शकलो. त्यामुळे आज मागे वळून पाहताना समाधान वाटतं. संघ कार्य म्हणजे ईश्‍वरी कार्य अशीच आम्हा स्वयंसेवकांची भावना असते. त्यामुळे या कार्यात मीही माझं योगदान देऊ शकलो याचा आनंद वाटतो.