जलसंधारणानं गावचं रूपचं पालटलं

SourceRSS JANKALYAN SAMITI    Date15-Apr-2016

नगर जिल्ह्यातलं दैत्यनांदूर गाव...निसर्ग आणि निंबादैत्य महाराजांच्या आशीर्वादानं गाव नांदत होता खरा, मात्र दरवर्षी कमी होत जाणाऱ्या पावसानं गावावर दुष्काळाची गडद छाया पसरली होती. कुठलाच मार्ग दिसत नव्हता. गावात बहुतांश मंडळी ऊसतोड कामगार. पावसाचं प्रमाणही माफकच. जलसंधारणाच्या सोयी नसल्यानं जमिनीत पाणी मुरण्याचा प्रश्‍नच नव्हता... मात्र कुणातरी या कामी पुढाकार घेणं गरजेचं होतं. अन्यथा दैत्यनांदूर मधल्या पुढील पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न आणखी भीषण होऊन बसला असता आणि तो तसाच राहिला असता...

बरं केवळ पाण्याचा प्रश्न होता असं नाही, तर इथं गावापर्यंत पोहचण्यासाठी रस्त्याचाही प्रश्‍न होताच. यासार‘या अनेक समस्यांनी गाव वैतागलं होतं. मात्र आपल्या बाजूच्याच एकनाथवाडीने जलसंधारणाच्या कामातून प्रगती पाहून ही मंडळी देखील अशाच कामासाठी मनाची तयारी करीत होती. 

दैत्यनांदूर गावानं सर्वानुमते एकनाथवाडीचा धडा गिरविण्याचं ठरवीत, गावाचा कायापालट करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - जनकल्याण समिती’चा ‘पॅटर्न जनकल्याण’ राबविण्यासाठी निश्चय केला. आपण देखील ‘पॅटर्न जनकल्याण’साठी विनंती करायची आणि आपल्या गावातही जलसंधारणाच्या कामातून गावकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा, असा निर्णय झाला आणि पाहता-पाहता जनकल्याण समिती, लोकवर्गणी आणि शासकीय योजनांच्या मदतीनं हे परिवर्तन घडलंही...

जलसंधारणाच्या कामासाठी अवघ्या सात दिवसांत एक लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून देण्यासोबतच सारा गाव ‘जनकल्याण समिती’च्या पाठीशी उभा राहिला आणि आठवडाभराच्या कालावधीत गावच्या पश्चिमेला असलेल्या इनामाच्या बंधाऱ्याच्या कामाला १६ ऑक्टोबर २०१३ रोजी सुरुवातही झाली.

२८० मीटर लांब, २० मीटर रुंद आणि सुमारे पाच मीटर बंधाऱ्याचं खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलं. १० नोव्हेंबर २०१३ पर्यंत काम चाललं. गाळाचा उपसा झाल्यानं पहिल्याच पावसांत बंधारा विस्तारला आणि मोठ्या प्रमाणात पाणी थांबलं. पावसाळ्यात बंधारा अगदी गच्च भरला आणि त्यासोबत गावातील शेतातील विहिरी देखील... हा विकास केवळ एवढ्यावरच थांबला नाही. या जलसंधारणाच्या कामासोबत इतर विकास कामांनी गावाचं रूपच पालटलं.

इथली सारी जमीन मुरमाड होती. कामाच्या वेळी लक्षात आलं की, सुमारे अठरा - वीस फुटापर्यंत सगळी जमीन मुरूमाची आणि खडकाळ आहे. मग त्यातून आणखी एक विकास काम करण्याचा निष्कर्ष पुढे आला आणि पावसातही फार चिखल होणार नाही, मोठी बस, दुचाकी, ट्रॅक्टर जाऊ शकेल असा रस्ता बनविण्यात आला. आज पाण्यासोबत गावाला चांगला रस्ता देखील मिळालायं. ‘पॅटर्न जनकल्याण’च्या कामातून गावाला दुहेरी फायदा झाला... आणि जलसंधारणाच्या या कामामुळे निंबादैत्यही सुखावला, अशी गावकऱ्यांची श्रद्धेची भावना आहे.

पाऊस आपल्या हातात नाही, मात्र पडलेलं पावसाचं पाणी थांबवणं, जिरवणं, नियोजनानं त्याचा योग्य वापर करणं, हे मात्र आपल्या हातात नक्की आहे. लोकांना लोकांसाठी बरोबर घेऊन चाललेल्या ‘जनकल्याण समिती’च्या कामातून हाच संदेश घेण्यासारखा आहे. पाऊस, निसर्ग जेवढा क्रूर तेवढाच प्रेमळही. गरज आहे ती, आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही हे पाहण्याची...

या विकासकामाच्या अधिक माहितीसाठी श्री. अरूण डंके – ९४२३०७६००४